प्रापंचिक मृगजळाचा सोन्याचा पिंजरा तोडून जाण्यास प्रखर इच्छेची ताकत लागते. सामान्य माणसाची सर्व शक्ती त्या मृगजळामागे धावण्यात जाते. पण अशी काही असामान्य व्यक्ती असतात जी, हा सोन्याचा पिंजरा तोडून आकाशी झेप घेतात. त्यापैकीच अशाच एका दांपत्यास भेटण्याचा योग आला. डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचेता धामणे. रविवार होता. कुटुंबातील सर्व सदस्य काही कौटुंबिक कामानिमित्त बाहेर गेले होते. जितू मामा (जितेंद्र काळोखे) म्हणाले की अशा ठिकाणी जाऊ जिथे आपण आपले स्वत्व विसरून जाऊ. आणि या दाम्पत्याच्या प्रकल्पास भेट देण्याचे ठरले.
अहमदनगर जिल्ह्यातील शिंगवे नाईक या गावी, त्यांच्या माऊली प्रतिष्ठान संचालित, ‘मनगाव’ या प्रकल्प ठिकाणी पोहचलो. तेथील स्वयंसेविका मोनिका साळवे यांनी प्रकल्प दाखवण्यास सुरुवात केली. या प्रकल्पात, निराधार मनोरुग्ण स्त्रियांचे पुनर्वसन केले जाते. आत गेल्यानंतर डोळ्यात भरते ते तिथली टापटीप आणि स्वच्छता. दुहेरी आश्चर्य म्हणजे हे सर्व करण्यामध्ये त्या स्त्रियांचाही सहभाग आहे. त्यांच्या वसतिगृहातही नजरेत ते भरते. तिथल्या शांततेतही एक उत्साह, प्रसन्नता होती.सर्व स्त्रिया आपली दैनंदिन कामे शांततेत, आत्मविश्वासानं करत होत्या. बाजूला एक आय. सी. यू. होत जे प्रायव्हेट हॉस्पिटलच्या तोडीचं होत. जवळच एक बेकरी होती जिथे या स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. बाजूला एक शेत होत जिथे या स्त्रिया शेतीची कामं करत होत्या. तिथल्या गोठ्यामध्ये काही स्त्रिया २० गायांसोबत रमल्या होत्या. लांब एक झाडीमध्ये छोट्या घराच्या अंगणात डॉ.धामणे ताई चुलीवर भाकरी भाजत होत्या. ते दृश्य हे मनाला अंतर्मुख करणार होत. दुसऱ्यांसाठी काहीतरी मोठं, जगावेगळं, असामान्य करण्याचा भाव सोडाच पण त्या माऊलीच्या चेहर्यावर ते करण्याचा आनंद होता.
योगायोगाने त्यांचे स्नेही आणि सी.ए. श्री. गुर्जर सर यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आमचे गावबंधू श्री.दीपक दरेही आले होते. त्या आनंदातही त्यांनी आम्हाला सामील करून घेतले. आवर्जून जेवायला बसवले. तो खूप संकोचाचा क्षण होता. ज्याची सेवा करावी अशा व्यक्तीच पाहुणचार करतायेत असं म्हटल्यावर फार अवघडल्यासारखं झालं. पण ताटात चुलीवरची बाजरीची खमंग भाकरी, काळया मसाल्याची भाजी, पिठले आणि तोंडी लावायला समोर हिरवी झाडी, थंड हवा आणि डॉक्टर दांपत्याची आपुलकी यामुळे संकोच पळून जाणे अपरिहार्य होते. मनसोक्त जेऊन झाल्यावर सर्वांचा निरोप घेतला.
निसर्गरम्य वातावरणात हा प्रकल्प आपल्याला अंतर्मुख करून जातो. मनोरुग्ण व्यक्ती हे त्याच्या सानिध्यात असलेल्या सर्वांसाठी एक मोठे आव्हान असते. डॉ धामणे यांनी ते स्वतः पेलण्याचा निर्धार कसा केला याच खरंच आश्चर्य वाटतं. तेही अशा लोकांसाठी ज्यांचा जन्मजमांतरीचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. तिथे त्यांनी एक डॉक्टर म्हणून फक्त उपचारच केले नाहीत, तर त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आणि त्यासोबत दिला तो आधार. जो त्यांच्या निराशमय जीवनात एक आशेचा न मालवणारा दिवा बनला. त्या दिव्यात आपल्या वैयक्तिक आयुष्यातील मिथ्या भौतिक सुखाची आहुती डॉ दांपत्याने कशी काय दिली असेल हे मला कोडेच आहे. त्या परिसरात सर्व दैनंदिन कामे या आजारातून बरे झालेल्या स्त्रियाच करत होत्या. वास्तविक पाहता ती कामे खूप साधी होती. पण आपल्या स्वतःचीही काळजी घेण्यास असमर्थ असणाऱ्यांचा, ती सर्व कामे करण्यापर्यंतचा प्रवास हा किती आव्हानात्मक आहे हे मनोरुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना समजेल. एव्हढे मोठे कार्य करूनही डॉ.दांपत्यात काही असामान्य केल्याचा लवलेशही नाही. अशी असामान्य लोकं खूप दुर्मिळ.
त्यांची ही भेट आत्मचिंतन करायला लावणारी ठरली. ‘मी का जगतोय’ हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी अशा ठिकाणी जावे जिथे विं. दा. करंदीकर यांचे ‘ देणाऱ्याचे हात ‘ भेटतात!