तोडी सोन्याचा पिंजरा

८-९ महिन्यांपूर्वी नवीन घर घेतलं.नवीन घरात नवीन मोठा टिव्ही आला.त्याला जोडून फायबर कनेक्शन आणि इंटरनेट आले.सुरुवातीला नवीन टिव्ही आणि त्याला जोडलेल्या इंटरनेटचं खूप कौतुक होत.शेकडो चॅनल्स,युट्यूब,ओटीटी वरचे सिनेमे यांनी घरात वेळ छान जात होता.मुलीही कार्टून, नॉलेज चॅनल्स,सायंटिफिक चॅनल्स यात मश्गूल रहात.

फायबर कनेक्शनचे ६ महिने संपत आले.त्याचा रिचार्ज करायचा विचार सुरू झाला.आणि एक निरीक्षण माझ्या नजरेत आले.मुली सकाळी ७.३० शाळेसाठी बाहेर पडतात.मी ९-१० वाजता हॉस्पिटलसाठी बाहेर पडतो.आमच्या मॅडम ११-११.३० ला बाहेर पडतात.मुली दुपारी आल्या की जेवण,झोप करून थोडा टिव्ही बघायला लागतात.संध्याकाळी ५-६ वाजता खेळायला जातात.मी ७-८ वाजता परत घरी येतो.फ्रेश झाल्यावर मीही थोडा टिव्ही पाहतो.तोपर्यंत मुली खेळून येऊन जेवण करतात.त्यांच्यानंतर मी जेवतो.तोपर्यंत मुली झोपून जातात.या सर्व दिनचऱ्येमध्ये माझा आणि मुलींचा संपर्क कुठे नव्हता किंवा फार कमी होता. त्यांच्या बालसुलभ जीवनात माझा काही सहभाग नव्हता.टिव्ही हेसुद्धा मनोरंजनाच साधन नसून दररोजचे मानसिक व शारीरिक ताण विसरण्याचा एक मार्ग होता.त्यातून असीम आनंद मिळाल्याचा अनुभव कधी आला नाही. तो टिव्ही माझ्या लेकरांचा हक्काचा वेळ खात होता.

एव्हढे अंतर्मुख झाल्यानंतर निर्णय घेतला,रिचार्ज करायचे नाही.टिव्ही बंद ठेवायचा.

आज जवळ जवळ ३-४ महिने झाले,टिव्ही बंद आहे.दुपारी मोठी मुलगी टीव्हीऐवजी चित्रकला आणि हस्तकला यात मश्गूल होते.छोटी आणि तिच्यामध्ये एकमेकांशी खेळणे वाढले आहे.संध्याकाळी मी आलो की त्यांची येण्याची वाट पाहतो.आले की आम्ही खेळतो,गप्पा मारतो.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही सर्वजण रात्री डायनिंग टेबलावर एकत्र जेवतो.तो आनंद कुठल्याही स्वर्गीय आनंदापेक्षा कमी नसतो.मुली शाळेत काय झाले,खेळात कोण जिंकले, कोण रडीचा डाव खेळले,कोण नवीन लोक सोसायटीत राहायला आले,ट्युशनमध्ये काय झाले अशा कितीतरी छोट्या पण गमतीशीर गोष्टी सांगतात.तो वेळ हा सर्वोत्तम श्रमपरिहार आहे.आमच्या कुटुंबाला जो एकत्रित थोडा वेळ मिळायचा तो टिव्हीने विभागाला गेला होता.तो गेल्यामुळे हा वेळ आता पुन्हा एकत्र आला.टिव्ही नावाचा सोन्याचा पिंजरा तोडण्याचे शहाणपण आम्हाला उशिरा का होईना पण आले हे आमच्या कुटुंबासाठी स्वर्गीय आनंदाची पर्वणीच ठरले. (आता टिव्हीपेक्षाही खूप खूप मजबूत पिंजरा तोडण्यावर विचार चालू आहे. त्याचे नाव आहे……. मोबाईल/भ्रमणध्वनी)